Youtube ChannelSubscribe Now

Featured Post

पुस्तके का व कशी वाचावी ? 

पुस्तके का व कशी वाचावीत? » Pustake Ka Va Kashi Vachavit


१) तुम्हाला वाचनाची आवड आहे, हे तुम्हाला मिळालेले एक वरदान आहे असे समजा. कुठलेही पुस्तक वाचण्यास घेताना त्याला पुस्तक न समजता एक कोडं समजा, ते कोडं आपण एकटे सोडवणार आहात असे गृहीत धरून वाचनास घ्या.

२) सुरुवातीला वाचन केवळ आनंद मिळवण्यासाठी करा.

३) येथे कोणाशीही तुलना करत बसू नका. मी एवढी पुस्तके वाचली. माझ्याकडे एवढी पुस्तके आहेत म्हणणारे केवळ लोकांना आपण कोणीतरी विशेष आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी मंडळी असतात.

४) केवळ हजारो पुस्तके वाचणे हा आपला उद्देश नसावा.

५) मानवी आयुष्य इतके मर्यादित आहे की तुम्ही २४ तास पुस्तके वाचत बसलात तरी तुमच्या बेभरवश्याच्या आयुष्यात काही हजारच पुस्तके वाचून होतील.

६) तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला भाराभर वाचन करावयाचे नसून प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरणारी ज्ञान, माहिती, उपदेश, आनंद, अध्यात्म, काव्य, रसास्वाद आणि मार्गदर्शन देणारी निवडक पुस्तके परिपूर्ण पद्धतीने वाचून स्वतःचे जीवन घडवायचे आहे हे स्वतःशी स्पष्ट करा.


७) पुस्तक हे साधन आहे, साध्य नव्हे. माणूस केवळ एका-मागोमाग पुस्तके आणत जातो व आपला ग्रंथसंग्रह वाढवत नेल्याने त्याच्याच मोहात अडकतो. अशाच मंडळींना समर्थ रामदासांनी पढतमूर्ख संज्ञा दिलेली आहे.

८) तुम्ही महिन्यातून १ पुस्तक वाचले तरी चालेल. घड्याळ लावून पुस्तके वाचायला ही कुठली शर्यत थोडीच आहे..?
पुस्तकाच्या विषयावरून आपल्याला एका पानासाठी किती वेळ लागतो हे ठरत असते.
आपल्या वाचनाचा वेग हा आपल्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो. आपली मनःस्थिती देखील त्यावेळी Matter करते. त्यामुळे पुस्तक वाचण्या अगोदर, "आपण ते शांत चित्ताने वाचू" अशी खात्री असल्याशिवाय वाचनास घेऊ नये. कारण अशा वाचनातून आपल्याला कोणताही लाभ होत नाही.

९) सर्व तऱ्हेची पुस्तके मजेत व आनंद घेत वाचा पण त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करा. उदा, एका प्रसिद्ध लेखकाचा कथासंग्रह वाचला तर त्यातील कथांचे विषय लेखकाला कसे सुचले असतील, त्यातील विविध पात्रे कशी वागतात यासाठी लेखकाने काय निरीक्षण केले असेल, यात शब्द- अलंकार- धक्कातंत्र यांचा वापर कसा केला आहे, या कथा आपल्याला का आवडल्या, हा लेखक इतका लोकप्रिय का, पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघाल्या अशी पुस्तकाची झाडाझडती घ्या. याला पुस्तकाचा सर्वांगाने अनुभव घेणे म्हणतात. पुस्तकांची केवळ संख्या वाढवण्याच्या शर्यतीत असणाऱ्यांना याचा गंधही नसतो.

१०) ज्या विषयात तुम्हाला गोडी आहे, तुम्ही वाचताना देहभान हरपून जाता, तीच पुस्तके तुम्ही वाचत राहा. फक्त एक करा की पुस्तक वाचून झाल्यावर त्यातील तुम्हाला आवडलेले १० मुद्दे एका वहीत टिपून ठेवा.

११) सुरुवातीला पुस्तके विकत घेण्याचा फंदात न पडता एखाद्या वाचनालयाचे सभासदत्त्व घ्या. तेथील पुस्तके चाळा, ज्यांचे विषय साधारण आवडतील ती वाचत राहा. एक दिवस तुम्हाला सर्वांत भावणारा वाचनप्रकार तुम्ही शोधून काढाल.

१२) मध्ये-मध्ये थांबून मी जे वाचन करतोय त्याने माझ्या जीवनाचा दर्जा, विचार करण्याची पातळी, प्रगल्भता व प्रत्यक्ष आचरण यात काही बदल होत आहेत का याचा शांत बसून विचार करा.

१३) वाचन ही विकासाची केवळ पहिली पायरी आहे. मनन, चिंतन, विश्लेषण, अनुभावन आणि अनुसरण या मोठ्या व कठीण पायऱ्या पुढेच आहेत.

१४) बहुतांशी लोक वाचनाच्या पहिल्याच पायरीवर अडकून बसतात व आयुष्यभर ग्रंथसंग्रह व शब्दसंग्रह करत राहतात. हे शाब्दिक ज्ञान एवढे वाढत जाते की आपण खरोखरच ज्ञानी असल्याचा अहंकार वाढत जातो पण प्रत्यक्ष आचरणशून्य जीवन जगत राहतात.

१५) केवळ वाचन करत राहणे त्यापेक्षा मी वाचन का करतो आहे याविषयी सावध राहा. एकाने एखादे पुस्तक वाचले तर मी ते वाचलेच पाहिजे असे काही नाही. तुम्हाला तो विषय आतून पटला तरच वाचा.

१६) मानवी इतिहासात ग्रंथलेखनाची नांदी झाल्यावर अनेक उत्कृष्ट दर्जाची अक्षरवाङ्मय गणली गेलेली, मानवी मूल्यांची महत्ता सांगणारी साहित्यसंपदा आपल्या पूर्वसूरींनी निर्माण करून ठेवलेली आहे. लाखो लोकांनी शेकडो वर्षे ती वाचली, त्याची पारायणे केली पण माणसाची आजची स्थिती पाहिली तर काही बदल झालेला दिसतो का..? यावरून काय तो बोध घ्यावा.

Post a Comment

Previous Post Next Post

Follow Us

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now
5 seconds remaining
Skip Ad >